Home Cities जळगाव मानराज पार्क–खोटे नगर महामार्गाचे काम आठवडाभरापासून ठप्प ; रस्ता बंद असल्याने नागरिकांची...

मानराज पार्क–खोटे नगर महामार्गाचे काम आठवडाभरापासून ठप्प ; रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मानराज पार्कसमोरील चौकापासून खोटे नगरपर्यंतच्या मुख्य महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत स्थानिक नगरसेवकांनी मागील आठवड्यात काम बंद पाडले होते. त्यानंतर या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले असले, तरी आठवडा उलटूनही काम पुन्हा सुरू झालेले नाही. त्यामुळे महामार्गाचा संबंधित मार्ग बंदच असून, शाळकरी मुले, महिला आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मागील आठवड्यात रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत स्थानिक नगरसेवकांनी काम थांबविले होते. या घटनेनंतर मध्यरात्री मनपा प्रशासनातील अधिकारी तसेच संबंधित मक्तेदार आशिष कासट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. यावेळी रस्त्याच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी मक्तेदार आशिष कासट तसेच उपमहापौरांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि नामदार गिरीश महाजन यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन या प्रकरणावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे नागरिकांना लवकरच रस्त्याचे काम पुन्हा सुरू होऊन मार्ग खुला होईल, अशी अपेक्षा होती.

मात्र, या आश्वासनाला जवळपास एक आठवडा उलटून गेला असून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला दिसत नाही. संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम बंद असून वाहतुकीसाठी मुख्य मार्गही खुला झालेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. विशेषतः या मार्गावरून शाळकरी मुले आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद असलेल्या मार्गामुळे नागरिकांना महामार्ग ओलांडून ये-जा करावी लागत असून, वाहनांची वर्दळ लक्षात घेता अपघाताचा धोका निर्माण झाल्याची चिंता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

रस्त्याचे काम नेमक्या कोणत्या कारणामुळे थांबले आहे, निकृष्ट दर्जाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे आणि काम पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याच्या कामाची तांत्रिक तपासणी करावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने विलंब न करता रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. कामाच्या दर्जाबाबत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून दर्जेदार काम करण्यात यावे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मार्ग शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound