रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी रावेर तालुक्यात आजपासून मोफत वाळू पास वाटपाची सुरुवात करण्यात आली. तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला, ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार, आज तहसील कार्यालयात घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पासचे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पासवर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. यामुळे लाभार्थ्यांना वाळू माफियांकडून आकारल्या जाणाऱ्या चढ्या दरापासून मुक्ती मिळाली आहे.
आज प्रत्यक्ष भोकर नदी पात्रात जाऊन तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, पंचायत समितीचे प्रतिनिधी फेगडे, मंडळ अधिकारी विठोबा पाटील, महसूल सहाय्यक भूषण कांबळे आदींनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना थेट वाळू वाहतुकीसाठीचे पास सुपूर्द केले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे विवरे खुर्द येथील लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार बंडू कापसे आणि संपूर्ण महसूल विभागाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे घरकुल योजनेच्या कामांना गती मिळणार असून, गरिबांना परवडणाऱ्या दरात घर बांधणे अधिक सोपे होणार आहे.