अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथे नूतन विद्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी सुमारास एक भीषण रिक्षा अपघात घडला. या अपघातात रिक्षा पलटी होऊन एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा क्रमांक एम.एच. १९ ए.एक्स. १५६२ ही अडावद नजीक नूतन विद्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडून अचानक पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षातील प्रवासी सुभाष यादव पाटील (वय ५२, रा. लोणी, ता. चोपडा) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात लोणी येथीलच कांतीलाल भिला पाटील (वय ३५), शांताराम वना कोळी (वय ५४) आणि बाळू वामन ठाकूर (वय ५५) हे तिघेही जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे लोणी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.