(एरंडोल नगरपालिकेच्या लमांजन पाणीपुरवठा योजने अंतर्गत टाकण्यात येत असलेली पाईपलाईन)
एरंडोल प्रतिनिधी । राज्य शासनाने सुमारे आठ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या मंजूर केलेल्या आकस्मित लमांजन पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरु असल्यामुळे लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. या योजनेमुळे शहरातील समस्या कायम स्वरूपी दुर होण्यास मदत होणार आहे.
याबाबत वृत्त असे की, एरंडोल शहराला अंजनी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र मागील वर्षी पुरेशा प्रमाणावर पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होऊ शकला नाही.त्यामुळे शहरात नोव्हेंबर महिन्यापासुनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहरात अंजनी प्रकल्पात असलेल्या अत्यल्प मृत जलसाठ्यातून दहा दिवसाआड केवळ पन्नास मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरात निर्माण झालेली पाण्याची समस्या दुर करण्यासाठी पालिकेने लमांजन पाणीपुरवठा योजना शासनाकडे सादर केली होती.शासनाने संबंधीत पाणीपुरवठा योजनेस तातडीने मंजुरी दिल्यामुळे या योजनेच्या कामास वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत लमांजन बंधारा ते पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे १८ किलोमीटर अंतराची तीनशे एम.एम. क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. लमांजन बंधार्यापासून जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत जलवाहिनीसाठी चारी खोदण्याचे काम चोवीस तास सुरु असुन त्यामध्ये जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचे काम पुर्ण होऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी सांगीतले.
या योजनेसाठी लागणार्या जलवाहिनी (पाईप) देखील आले असुन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान शहरात अंजनी प्रकल्पातील मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असुन मृतसाठ्यात देखील झपाट्याने घट होत आहे. पालिकेतर्फे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. लमांजन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे.
(लमांजन बंधार्यात असलेला जलसाठा)