कुंझरकरांच्या मृत्यूचे गुढ लवकरच उलगडण्याची शक्यता

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल येथील रहिवासी तथा गालापूर जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांच्या मृत्यू प्रकरणी एलसीबीच्या पथकाने सीसीटिव्हीचे फुटेज जमा केले असून यामुळे आता हे प्रकरण लवकरच उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आदर्श शिक्षक तथा गालापूर जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील-कुंझरकर यांच्या खुनाच्या तपासाला आता वेग आला आहे. प्राथमिक तपासात कुंझरकर यांना दुसर्‍या जागेवर मारहाण करून नंतर त्यांचा मृतदेह पळासदळे परिसरात आणून टाकल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून कुंझरकर यांचा मृतदेह आढळल्याच्या ठिकाणी त्यांना मारहाण झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. डोक्याला मागच्या बाजूस दुखापत झाली आहे. डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाला असून, यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. याबाबत अधिक तपासणीसाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे किशोर पाटील कुंझरकर यांना पहाटे तीन वाजता कुणाचा तरी फोन आल्यानंतर ते घराबाहेर पडले असा दावा त्यांच्या पत्नीसह आप्तांनी केला होता; परंतु त्यांना कोणाचाही फोन आला नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहकार्‍यांसह या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला असून त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून यातून काही महत्वाचे धागेदारे जाणून घेतले आहेत. यामुळे या प्रकरणी लवकरच दोषींपर्यंत पोलीस पोहचतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Protected Content