महिला बचत गटांची दिवाळी मेळाव्यात एक कोटी १८ लाखांची उलाढाल : मीनल करनवाल


जळगाव : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आत्मनिर्भरतेचा उत्तम नमुना सादर केला आहे. जिल्हा पातळीवर २०० हून अधिक स्टॉल उभारून महिलांनी स्वतः बनवलेल्या दिवाळी फराळासह हस्तकला वस्तू, सजावटी साहित्य आणि गृहउपयोगी उत्पादने विक्रीस ठेवली. या उपक्रमातून तब्बल एक कोटी १८ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांना व्यवसायाची नवी दिशा आणि स्थिर बाजारपेठ मिळाली आहे. जळगाव शहरातील जी.एस. मैदानावरील प्रदर्शनातून तसेच नशिराबाद परिसरात भरलेल्या दिवाळी बाजारात महिलांच्या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या फराळ, सजावटी दिवे, फुलांची आरास, पेपर बॅग्स, तसेच स्थानिक कृषी उत्पादनांपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली.

या उपक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या “उमेद अभियान” अंतर्गत विशेष प्रयत्न करण्यात आले. महिला बचत गटांना स्टॉल उभारणीसाठी, प्रशिक्षणासाठी आणि विपणनासाठी आर्थिक व तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे अनेक ग्रामीण महिलांना पहिल्यांदाच थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवण्याची संधी मिळाली.

महिला बचत गटांना या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद सर्वांवर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, उमेद अभियानाचे व्यवस्थापक हरीश भोई, तालुका अधिकारी तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी सरला पाटील, रवींद्र सूर्यवंशी आणि स्वप्निल पाटील यांनी आवश्यक सहकार्य केले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिलांच्या उद्यमशीलतेला नवे बळ मिळाले आहे.