चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील नागलवाडी येथील अवैध दारू विक्री विरूद्ध गावातील महिलांनी एकत्र आल्या आहेत. गावातील दारू विक्री करणाऱ्या सहा ते सात घरातून गावठी व देशी दारू हस्तगत करून जमा करत संतप्त महिलांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास चोपडा शहर पोलिसांना भाग पाडले.
नागलवाडी गावात दारू बंद झालीच पाहिजे,अशा घोषणांनी शहर पोलीस ठाणे परिसर महिलांनी दणाणून सोडला. या महिलांनी थेट गावठी दारूचे भरलेले ट्यूब पकडून आणले होते. यावेळी मीराबाई भिल,ज्योती भिल,रेखाबाई पाटील,हिरालाल भिल आदी महिलां उपस्थित होत्या. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात प्रकाश मथुरे याच्या फिर्यादीवरून दारू विक्री करणारे समाधान सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी संतप्त महिलांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात बसून नागलवाडी गावात दारू बंद झालीच पाहिजे,अशा घोषणा दिल्या.