यावलमध्ये गॅरेजला आग ; तीन चारचाकी वाहनं जाळून खाक

e0a5f256 d6ef 4f02 a370 1e24d3dd2d1e

यावल (प्रतिनिधी) येथील भुसावळ रस्त्याला लागून असलेल्या एका गॅरेजला मध्यरात्री नंतर आग लागून सुमारे ११ लाख रुपये किंमतीच्या तीन चारचाकी वाहनं जळून खाक झाली आहेत. या आगीत जळालेली वाहनं ही गॅरेजमध्ये दुरुस्तीकरिता लावली होती. यामुळे गॅरेज चालकास मोठा आर्थिक फटका बसला आहे.

 

या आगीत गॅरेजचे शेड व त्यातील अनेक वस्तू देखील जळून खाक झाली आहेत. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला. तर यापूर्वी देखील या गॅरेजमध्ये आग लागून दुचाकी वाहनं जळाली होती. यावल – भुसावळ रस्त्यावर बीएसएनएल कार्यालय याच्यापुढे योगेश रमेश नेमाडे याचे दुचाकी व चार चाकी वाहन दुरुस्ती करण्याचे गॅरेज आहे. या नईम छोटू पटेल (रा. विरार नगर, यावल) यांच्या मालकीची ७ लाख रूपये किंमतीचे बोलेरो (एम. एच. १९ बी. यु. ५५७), नरेंद्र कोळी मनवेल यांची २ लाख रूपये किंमतीची इंडीका क्रमांक (एम.एच.४३ एन. १४५५) व दहीगाव येथील एका ग्राहकाची २ लाख रूपये किंमतीची इंडीका क्रमांक (एम. एच.०५ ए.बी.०३७०) ही वाहनं दुरूस्ती करीता आलेली होती.

 

बुधवारी पहाटे पुर्वी गॅरेजला अचानक आग लागली. या आगीत ११ लाख रूपये किंमतीचे वरील तीन्ही वाहनं आगीत जळून खाक झाले. तसेच गॅरेजचे शेड आणि त्यातील साहित्यही या आगमध्ये जळून नष्ट झाली आहे. गॅरेजमध्ये दुरुस्ती करिता लावलेले वाहनं जळाल्यामुळे गॅरेज चालकांस नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याबाबत यावल पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content