डोंगर कठोरा येथील बेघर वस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरीकांचे आरोग्य धोक्यात

43f5a9ac 7315 4ee7 9b9d 928fa8abe715

 

यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील बेघर वस्तीतून जाणाऱ्या गटारीमुळे सर्वत्र दुर्गंधीचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भातअधिक असे की, डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतीच्या हेतुपुरस्पर दुर्लक्षामुळे गावातील दलीत वस्तीला लागून बेघर वस्तीचे जवळ जवळ ६५ ते ७० घरे आहेत. या घरांजवळून वाहुन जाणारे सांडपाणी त्याच परिसरात राहणारे नसीब रज्जाकशाह, रमाबाई जनार्धन आढाळे, संतोष जनार्धन आदाळे, युवराज भिका तायडे यांच्या घरासमोर मोठया प्रमाणावर जमा होत आहे. त्यामुळे या नागरिकांना अतिशय दुर्गंधीयुक्त वातावरणात राहावे लागत आहे. ग्रामपंचायतीव्दारे या परिसरात मोठी गटार बांधावी म्हणून ग्रामस्थांनी मागील पाच वर्षात अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार करून मागणी केली आहे. परंतू सरपंच सुमनबाई वाघ या नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

यावेळी मान्सुन येण्यापुर्वी तरी या घाणीच्या सांडपाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तरी ग्रामपंचायतीने तात्काळ या घाणीचा प्रश्न पावसाळ्याआधी मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

सरपंच सुमनबाई वाघ यांना या संदर्भात विचारणा केली असता, गावातील स्वच्छा राखणे आणि ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य वजा जबाबदारी आहे. या परीसरातील राहणाऱ्यांनी आपआपल्या घरासमोर मोठमोठे खड्डे करून ठेवले आहेत. या खड्डयांमध्ये वापरलेले सांडपाणी त्यात जमा होत असते. त्यामुळेच या ठीकाणी ठीक ठीकाणी डबके साचल्याचे चित्र आहे. ग्राम पंचायत या वस्तीत गटार बांधून देण्यास तयार आहे. मात्र, या विषयाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्याचेही सरपंच सुमनबाई वाघ यांनी सांगितले.

Protected Content