अभोणे येथे ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी महिला संघटना सरसावल्या

5b86b243 1445 4894 8c99 163166c19cd6

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अभोणे या गावाने ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला असून तालुक्यातील महिला संघटनांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनीही श्रमदानात हातभार लावत पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवनिर्माणाचा चंग बांधला आहे. राज्यात पाणी ही मोठी समस्या असून पाण्याच्या दुर्भिक्षाने अनेक आयुष्यांची अक्षरशः वाताहत झाली आहे. यावर उपाय म्हणून पाणी फाउंडेशनने तालुक्यात अनेक ठिकाणी जलव्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

आज सर्वत्र शेतकरी दुष्काळाला आणि उपासमारीला तोंड देत असून पाण्याच्या कमतरतेमुळे हे मानवनिर्मित संकट उद्भवले आहे. भूगर्भातल्या पाण्याचे पुनर्भरण न करता बेपर्वाईने भूगर्भातल्या पाण्याचा उपसा झाल्याने पाण्याचा स्तर खालावला असल्याने सर्वत्र विदारक चित्र उभे राहिले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जिरवणे, त्याद्वारे भूगर्भ पातळीत वाढ करणे, तसेच पाणी वाहून गेल्यामुळे झालेला अपव्यय व बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान यामुळे टाळता येणार असल्याचे जयपाल हिरे यांनी यावेळी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात या चळवळीस सुरुवात झाली असून हा उपाय मोठ्या संख्येने जास्तीत जास्त गावांनी अवलंबला असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे स्मिता बच्छाव यांनी सांगितले. सर्वांसमोर पाणी बचतीचे मोठे आव्हान उभे ठाकले असून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. त्याशिवाय पाण्याची टंचाई दूर होणार नाही आणि पाण्याचा अनिर्बंध वापर रोखणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे सुचित्रा पाटील यांनी म्हटले.

चाळीसगाव शहरातील युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वतीने तालुक्यातील अभोणे या गावी पाणी फाउंडेशन अंतर्गत जलव्यवस्थापन करण्यात येवून त्यासाठी श्रमदानही करण्यात आले. या कार्यात युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या प्रीती रघुवंशी, लता जाधव, विद्या कोतकर, योगिता राजपूत, उज्वला पाटील, छाया पाटील, अनिता शर्मा, वैशाली काकडे आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी मेहुणबारे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या सहका-यांसह मोहिमेत सहभागी होत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठीचा विडा उचलल्याचे दिसून आले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या चमूने श्रमदान करीत अनोखा आदर्श निर्माण केला.

Add Comment

Protected Content