इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती जनहितार्थ उपलब्ध करावी- दिपक सपकाळे

जळगाव प्रतिनिधी । इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या स्थानिक शाखेतील आर्थिक लेखांची माहिती जनहितार्थ उपलब्ध करण्यात यावी, तसेच टाळेबंदीच्या काळातील मिळालेल्या देणग्यांचा हिशोब व शासनाकडून मिळालेल्या निधीची माहिती माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दीपक सपकाळे यांनी केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले आहे.

दिपक सपकाळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेवाभावी असलेली इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव या संस्थेला चालवत असलेल्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे चांगल्या संस्थेच्या कारभारावर संशय निर्माण होत आहे. संबंधीत इंडियन रेडक्रॉस सोसायटीला माहितीचा अधिकार लागू असून देखील वेळोवेळी या संस्थेकडून अर्जदारांची दिशाभूल करून माहिती नाकारली जाते. माहितीचा अधिकार लागू असूनही धादांत खोटं लिहून माहिती अधिकार लागू नसल्याचे खोटे पत्र काढून माहिती थेट नाकारली जाते. यामुळे या संस्थेच्या संचालक मंडळांनी कितीही चांगले कामे करून सेवाभावाचा मुलामा स्वतःवर चढवून घेतला तरी संशय निर्माण होतो. मी पूर्णतः असे मानत नाही की या संचालक मंडळाने खूप मोठा भ्रष्टाचार केला असेलच परंतु माहिती नाकारून, माहिती दडवून ठेवण्यात या संस्था चालकांना काय रस आहे हे देखील स्पष्ट होत नाही. माहिती समोर आल्यावर दूध का दूध, पानी का पानी या प्रमाणे समोर येईलच. मग माहिती देण्यास संचालक मंडळ व येथील प्रशासनाला भीती कसली असावी ? असा प्रश्‍न मला गेल्या तीन वर्षांपासून सतावत आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या तीन चार वर्षाच्या काळात इमारत नव्याने बांधकाम करण्यासाठी याच संचालक मंडळाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या मालकीची इमारत खाली करून भाडे तत्वावर इमारत घेतली. यामुळे संस्थेचे लाखो रुपये भाड्यापोटी गेले. मात्र यांनी नवीन इमारत न उभारताच फक्त दुरुस्तीची कामे करून पुन्हा मोठ्या कालावधी उलटल्या नंतर स्व मालकीच्या इमारतीत परतले तो पर्यंत लाखो रुपये भाडेपोटी खर्च झालेले होते.याबाबतही माहिती मागूनही माहिती मिळाली नाही. आता देखील कोरोनाच्या काळात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संचालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक अवाहन करीत चांगल्या कामासाठी मदत करा व संस्थेच्या खात्यावर अथवा प्रत्यक्ष सोसायटीच्या कार्यालयात देणगी देण्याबाबत आवाहन करण्यात आले असून याला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या काही अधिकार्‍यांनी शिक्षकांना सोशल मीडियातून अवाहन करत इंडियन रेडक्रॉस सोसायटीला देणगी देऊन ऑनलाईन पेमेंट दिल्या बाबत स्क्रिनशॉट वरिष्ठांनी मागवली आहे. देणगी देणं जर ऐच्छिक आहे तर शिक्षकांनी देणगीच्या ट्रान्झॅक्शनच्या स्क्रिनशॉट मागविण्याचा उद्देश काय असावा ?

कृषी विभागाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीला मदतीचा दिलेला धनादेश सदस्य, सभासद नसलेले जात पडताळणीचे अध्यक्ष व कोविडचे कमांडर यांनी का स्वीकारावा ? महसूल कर्मचारी संघटनेचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री केयर फंड ला देण्या ऐवजी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटी या संस्थेला द्यायला लावणे, रक्त पुरवठा करणे हा मुख्य उद्देश असणार्‍या व कॅटरिंग (जेवणावळ) या व्यवसायाशी दूर दूर पर्यंत संबंध नसतांना, सोसायटीचे कुठलेलंही स्वतःचे किचन नसतांना कोविड रुग्णांना आहार सेवा देण्याचे कामही या संस्थेला कसे दिले जाते? असे अनेक प्रश्‍न मला सतावत असून अनुउत्तरित आहेत. या पार्श्‍वभूमिवर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगाव या संस्थेला लॉकडाऊन काळात इतर दात्यांकडून व शासनाकडून किती रुपयांची मदत निधी मिळाला व त्याचा काय विनियोग झाला यांचा हिशोब जिल्ह्यातील जनतेसमोर आणावा व मागेल त्याला माहितीच्या अधिकारात शुल्क आकारून उपलब्ध करून द्यावे असे यात नमूद करण्यात आले आहे.

या संस्थेच्या घटनेनुसार जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आपणास माहित आहे की जिल्हाधिकारी पदावर असतांना मोठ्या जबाबदारीतून जावे लागते व्याप मोठा असल्याने आपसूक जिल्हाधिकारी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या दैनंदिन कामकाजाकडे बारकाईने लक्ष देऊ शकत नसल्यानेच याचा गैरफायदा घेत हे संचालक मंडळ मनमानी व स्वमालकीची संस्था असल्यागत वागत असतात. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही सेवाभावी उद्देशाने नोंदणी झालेली संस्था आहे. संस्था चांगली असून अशा संस्था कायमस्वरूपी टिकल्या पाहिजे हा प्रामाणिक हेतू आहे.संस्था चालवणार्‍या संचालक मंडळाच्या काही धोरणांमुळे संस्था बदनाम होत आहे.त्यामुळे आपण या बाबत गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शकतेने निर्णय घ्यावा अशी मागणी दिपक सपकाळे यांनी या निवेदनात केली आहे.

Protected Content