ग्रामपंचायत प्रशासकासाठी स्वयंसेवी संस्थांचा प्रतिनिधी नेमावा : शामकांत जाधव यांची मागणी

चोपडा, प्रतिनिधी । सद्या अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपली असल्याने व कोविड-19 कोरोना मुळे उद्भवलेल्या महामारीत निवडणुक घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ग्राम पंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्याचे ठरविले असल्याने प्रशासक नेमणुकीच्या घडामोडीला वेग आला आहे. परंतू या महामारीच्या, लॉकडाऊन काळात आपल्या जीवाची पर्वा न -करता ज्यां स्वयंसेवी संस्थानी मदत कार्य केले आहे अश्या संस्थाच्या प्रतिनिधीना ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून संधी द्यावी अशी मागणी प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष शामकांत जाधव यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सामाजिक संस्थेतील पदाधिकाऱ्याना शासनाने प्रशासकपदी संधी दिली तर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संघटनाना प्रेरणा मिळेल व इतरही स्वयंसेवी संघटना जोमाने कार्य करतील. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या स्वयंसेवी संघटनाना ही न्याय मिळू शकेल. शासनाचे धोरण आहे की गाव हे तंटामुक्त असले पाहिजे परंतु प्रशासकपदी निवड करतांना जनसामान्यांचा सहभाग नसल्याने प्रशासकाची निवड होणार आहे त्यामुळे गावागावात विरोधाभासात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे तंटामुक्ती तर दूरच परंतु गटागटात भांडणे बळावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अनेक सामाजिक संस्था कोविड-19 मुळे उद्भवलेल्या महामारीमध्ये शासन, प्रशासन व जनतेची मदत करत आहे. प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जिद्द आहे व चांगले कार्य करून दाखवण्याचे सामर्थ्य आहे. तसेच व्यवस्थापकीय समज व जाण असल्याने ग्रामपंचायतचे प्रशासक म्हणून स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी चांगले कार्य करू शकते. तेव्हा प्रशासक म्हणून सरकारने NGO प्रतिनिधी नेमावे अशी मागणी प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्या वतीने शामकांत जाधव यांनी केली आहे. शासन,प्रशासनेच अश्या सामाजिक कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दयावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. स्वयंसेवी संस्थाना संधी देऊन ग्रा. पं. प्रशासक म्हणून गावाची सेवा करण्याची संधी दयावी अशी मागणी केली आहे.

Protected Content