जामनेर येथे महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

WhatsApp Image 2019 03 05 at 7.06.46 PM

जामनेर (प्रतिनिधी)। अतिक्रमणाच्या प्रलंबित प्रश्नावर वारंवार सांगूनही न्याय मिळत नसल्यामुळे शहरातील एका महिलेने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात आज (५ मार्च ) अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पळासखेडे बुद्रुक येथील सुनंदा सोनार असे त्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबतचा वाद गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय स्थानिक ग्राम पंचायतीच्या अखत्यारीतील असल्याने त्याबद्दल त्यांनी गेल्या तीन वर्षांत स्थानिक ग्रामपंचायती पासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत न्यायासाठी दाद मागितली आहे. मात्र या प्रश्नाचे समाधान न होता, दरवेळी निराशाच त्यांच्या पदरी पडली आहे. त्यामुळे हताश होवून आज आपण हे टोकाचे पाऊल उचलले आहे, असे त्या महिलेचे म्हणणे आहे.

येथील गट विकास अधिकारी अजय जोशी यांच्या दालनात या महिलेने प्रवेश करून आपली आपबिती कथन करत सोबत कँनमधे आणलेले रॉकेल अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित कार्यालयीन कर्मचारी महेंद्र मोरे व सामाजिक कार्यकर्ते बाळू चव्हाण यांनी वेळीच महिलेच्या हातातील कँन हिसकावून घेत पोलिसांना फोन करुन बोलवून घेतले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कारवाई केली. या आधीही २६ जानेवारी रोजी सदर महिलेने प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. तेव्हाही कुठलाच निर्णय न मिळाल्याने महिलेने असे पाऊल उचलले असवे. तर दुसरीकडे गट विकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की, सदर प्रकरणाची चौकशी करून त्या जागेची परत मोजणी करण्याकामी भुमी अभीलेख कार्यालयाशी कायदेशीर पत्र व्यवहार केला आहे. त्यांच्या अहवालात जर सदर महिलेच्या जागेवर अतिक्रणम झाले असल्याचे निदर्शनास आल्यास अतिक्रमण काढण्याच्या सुचना संबंधितानां देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Add Comment

Protected Content