जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरानजीक असलेल्या खेडी शिवारातील प्रेम बेकरीजवळ एका महिलेच्या घरात घुसून अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केला तर महिलेच्या पतीसोबत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहराजवळील खेडी शिवारातील प्रेम बेकरी परिसरात ४० वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महिला ही पती सोबत घरी असतांना संशयित आरोपी रविंद्र उर्फ गोलू भागवत चौधरी आणि चेतन प्रदीप गाजरे रा.खिरोदा ता.रावेर या दोघांनी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत महिलेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर तिच्या पतीला धक्काबुक्की केली, याप्रकरण महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. महिलेच्या फिर्यादीवरून शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी रविंद्र उर्फ गोलू भागवत चौधरी आणि चेतन प्रदीप गाजरे रा.खिरोदा ता.रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे.