जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेत नोकरीस असलेल्या महिला कर्मचारीस दुचाकीची जोरदार धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना आकाशवाणी चौकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संगीता राजेश सुरळकर (वय ४२, रा. नवजीवन सुपर शॉपच्या मागे) ह्या जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. संगीता ह्या १८ ऑक्टोबर रोजी कामावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १९ सीसी ७३१४) आकाशवाणी चौकातून घराकडे जात होत्या. यावेळी एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात संगीता सुरळकर यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. दरम्यान, त्यांना धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी संगीता सुरळकर यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे तपास करीत आहेत.