मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील राजकीय वर्तुळात हादरवून टाकणार्या घडामोडी घडत असतांनाच मनसे आणि ठाकरे गटात सलोख्याचे वारे वाहू लागले असून यातून उध्दव आणि राज हे दोन्ही एकत्र येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगळी चूल मांडतांना थेट राज्यातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याचे राजकारण हादरले आहे. यामुळे शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादीतही उभी फूट पडली असून आता यापुढे कॉंग्रेससह अन्य पक्षांना फुटीचा तडाखा बसू शकतो अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर आली आहे.
उध्दव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी आजवर अनेकदा प्रयत्न करण्यात आले असले तरी याला यश लाभलेले नाही. आता मात्र दोन्ही भावांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज सामनाच्या कार्यालयात जाऊन खासदार संजय राऊत यांची दीर्घ काळ भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द पानसे यांनी याबाबत काहीही भाष्य केले नसले तरी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.