मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात कोरोना रुग्णांची संख्ग्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स यासारख्या गर्दीच्या ठिकाणी कोविड टास्क फोर्सनं मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. आता महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अस मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मास्कसक्तीसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.