पाडळसरेच्या आशा पल्लवीत : आता प्रत्यक्ष निधीची प्रतिक्षा

अमळनेर-गजानन पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारोळा येथील भाषणात निम्न तापी प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल अशी घोषणा केली असली तरी ही घोषणा प्रत्यक्षात उतरणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

निम्न तापी प्रकल्प अर्थात पाडळसरे धरण रखडल्याने अमळनेरसह परिसरातील तालुक्यांमध्ये मोठा उद्रेक निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परिसरातून तब्बल ५२ हजार पत्रे पाठविण्यात आली होती. यात अनेक शेतकर्‍यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून व्यथा मांडली होती. ही पत्रे मुंबईला पोहचल्यानंतर काल जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पार पडला.

या दौर्‍यात पारोळा येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी निम्न तापी प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल अशी घोषणा केली. या प्रकल्पाबाबत सहानुभूतीने विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे परिसरातून स्वागत करण्यात येत असून यामुळे पाडळसरेचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पाडळसरेबाबत आजवर अनेक नेत्यांनी मोठ्या बाता केल्या असल्या तरी प्रत्यक्षात पदरात काहीही पडलेले नाही. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा ही प्रत्यक्षात उतरून त्यांनी पाडळसरे धरणासाठी येत्या काही दिवसांमध्ये सादर होणार्‍या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी अपेक्षा आता परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content