अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातून दुचाकीने घरी जात असतांना मंगरूळ गावाजवळील साई प्रसाद हॉटेलसमोर अचानकपणे रस्त्यात कुत्रा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील ४९ वर्षीय प्रौढाचा उपारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दगा पाटील (वय-४९) रा. मंगरूळ ता. अमळनेर असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गणेश दगा पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. ७ जानेवारी रोजी गणेश पाटील हे त्यांचे चुलत भाऊ युवराज धोंडू पाटील यांच्या सोबत दुचाकी (एमएच १९ एडी ५८१९) ने शेतात लागणारे औषधी घेण्यासाठी अमळनेर शहरात जात होते. मंगरूळ गावाजवळील साई प्रसाद हॉटेल समोरून जात असतांना अचानकपणे रस्त्यात कुत्रा आल्याने दोघेजण दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. या अपघात गणेश पाटील याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. अखेर उपचारादरम्यान २० जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत युवराज धोंडू पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.

Protected Content