कृषी बाजार समितीची जागा विकू देणार नाही- आमदार किशोर पाटील

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या हिताची व तालुक्याचे वैभव असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा ज्यांच्या काळात अत्यल्प किंमत ठरवून विक्री व्यवहार करण्यात आला, तेच उपरे आता आव आणून आमचा जागेशी काही संबंध नाही, असा देखावा करून दिशाभूल करीत आहेत.

मी जागा वाचविण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सर्वार्थाने प्रयत्न करीत असून, नागपूर विधानसभा अधिवेशनातही याबाबत आवाज उठवून तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी केली.

आताही शपथ घेऊन सांगतो बाजार समितीची एक इंचही जागा विकू देणार नाही, अशी ग्वाही देत उपस्थित शेतकऱ्यांकडून हात उंचावून त्याचा आमदार किशोर पाटील यांनी दुजोरा मिळवून घेतला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी (ता. ३०) दुपारी बाजार समितीच्या आवारात शेतकरी कृषी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘आत्मा’चे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे, अश्वमेध संस्थेचे किशोर मोरे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, रवींद्र पाटील, महेश कासार, बी. बी. बोरुडे, संचालक प्रकाश तांबे, पूनम पाटील, मनोज सिसोदिया.

युसूफ पटेल, सुनील पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, श्‍यामकांत पाटील, पंढरीनाथ पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), डॉ. विशाल पाटील, पदमसिंग पाटील, युवराज पाटील, विकास पाटील, रमेश जाधव, हर्षल पाटील, प्रतीक ब्राम्हणे, आनंदा पाटील, शशिकांत येवले, अनिल पाटील, राजेंद्र पाटील भडगाव, देविदास पाटील, रवी केसवानी, शरद पाटे, किशोर बारवकर, बंडू चौधरी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांच्या विकास दिनदर्शिकेचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अनिल भोकरे यांनी ‘कृषी उद्योजक काळाची गरज’ या विषयावर तर कैलास मोरे यांनी ‘कृषी क्षेत्रातील तांत्रिक विभागाच्या योजना’ यावर उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी तालुकाप्रमुख सुनील पाटील, भाजपचे मधुकर काटे, रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार किशोर पाटील यांनी आपल्या पाऊण तासाच्या मनोगतात व्हिडिओ दाखवत बाजार समिती जागा विक्री प्रक्रियेत जागा खरेदीदारांसोबत बाजार समिती आवारात फिरणाऱ्या सतीश शिंदे व जागा विक्री मंजुरी पत्रावरील शिंदे कुटुंबीयांच्या सह्या दाखविल्या. तसेच जागा विक्रीसंदर्भात नागपूर विधानसभा अधिवेशनात मांडलेली भूमिका व्हिडिओद्वारे दाखवून मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेल्या पाच कोटी कर्जाचे लेखी पत्र दाखविले.

वीस कोटी रुपये किमतीच्या जागेची किंमत नऊ कोटी करून चार कोटीत विक्री करण्याचा घाट घालणाऱ्यांनी शेतकरी व जनतेची दिशाभूल करू नये. त्यांना शेतकऱ्यांबाबत कळवळा असेल तर त्यांनी विकलेली जागा कोणत्याही परिस्थितीत खरेदी करणाऱ्यांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी उघड भूमिका घ्यावी, असे सांगून पंतप्रधान पीकविमा योजनेसंदर्भातही अमोल शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या माहिती संदर्भात त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

खासदारांना पाडण्याची सुपारी व भाजप संपविण्याची सुपारीच अमोल शिंदे यांनी घेतली असल्याचा संशय येत असल्याचे सांगितले. सुनील पाटील, रावसाहेब पाटील यांनीही बाजार समिती जागेसंदर्भात भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या हिताची इंचभरही जागा आम्ही बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाहीत, असे सांगितले.

Protected Content