सत्तेच्या लालसेनेच ठाकरे पाटण्यात पोहचले : एकनाथ शिंदेंची टिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री असतांना दोनदाच मंत्रालयात फिरकलेले उध्दव ठाकरे हे सत्तेच्या लालसेमुळेच पाटण्यात पोहचले असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

 

काल पाटण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने देशातील प्रमुख भाजपेतर पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. यात आगामी निवडणुकीसाठी मोदी यांच्या विरोधात एकत्रीत लढण्याची घोषणा करण्यात आली. यात शिवसेना-उबाठा पक्षाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा देखील समावेश होता. यावरून भाजपने कालच त्यांच्यावर टिका केली. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून तोफ डागली आहे.

 

या संदर्भात आज एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणार्‍या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या कॉंग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणार्‍या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहर्‍यावर नैराश्यच दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल.

 

कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का? असा प्रश्‍न या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे.

Protected Content