जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खेडी बुद्रुक गावात पतीने धारदार शास्त्राने पत्नीवर आणि मुलावर वार करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडला आहे. याप्रकरणी शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, माधुरी समाधान सपकाळे वय-३५ या महिला आपले पती समाधान सपकाळे व मुलगा ऋषभ यांच्यासोबत सुनसगाव येथे वास्तव्याला आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माधुरी सपकाळे आणि त्यांचे पती समाधान सपकाळे यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. त्यामुळे माधुरी सपकाळे या महिला आपला मुलगा ऋषभ सपकाळे याला सोबत घेऊन जळगाव शहराजवळील खेडी बुद्रुक येथील नातेवाईकांकडे वास्तव्याला आहेत. दरम्यान गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच सुमारास समाधान सपकाळे हा महिलेच्या घरी आला. घराचा दरवाजा तोडत आत प्रवेश केला आणि पत्नी माधुरी सपकाळे आणि मुलगा ऋषभ सपकाळे यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून जखमी करत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना घडली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महिलेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समाधान सपकाळे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे करीत आहे.