एकीकडे नगर मतदारसंघात सुजय विखेंसारख्या तुल्यबळ उमेदवारासाठी काँग्रेसला जागा सोडण्यास नकार देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी सहजासहजी रावेरची जागा काँग्रेसला का दिली ? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खरं तर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे काही हक्काचे पॉकेटस् आहेत. निधर्मी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ मराठा बहुल असतांनाही राष्ट्रवादीला येथे प्रबळ उमेदवार न मिळणे ही शोकांतिकाच मानावी लागणार आहे. या मागची कारणे तपासून पाहिली असता आपल्याला अनेक नवीन बाबींचे आकलन होऊ शकते.
लेवा पाटीदार समाजाचा चेहरा नाही
१९९९ साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादीच्या रूपाने शरद पवार यांनी सवतासुभा उभा केला. यावेळी तेव्हाच्या जळगाव मतदारसंघातून मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन आणि अरूणभाई गुजराथी यांच्यासारखे मातब्बर त्यांच्यासोबत आले. त्यापैकी बाळासाहेब चौधरी यांनी अल्पावधीतच पुन्हा काँग्रेसचा हात पकडला. तर जे.टी. दादांनी घड्याळावर लोकसभा लढवली तरी त्यांना अपयश आले. नंतर त्यांचे पुत्र शरद महाजन हेदेखील काँग्रेसच्याच वाटेने गेले. यामुळे आज दोन दशकानंतर अरूणभाई व त्यांच्या समर्थकांचा अपवाद वगळता बाळासाहेब आणि जे.टी. दादा यांचे वारसदार राष्ट्रवादीत राहिले नाही. परिणामी तापी खोर्यातील प्रबळ असा चेहरा राष्ट्रवादीला गवसला नाही. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे लेवा पाटीदार समाजात सर्वमान्य असणारा कोणताही नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आला नाही. अलीकडच्या काळात भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांना पक्षाने संघटनेत महत्वाचे पद दिले असले तरी या समाजात विश्वास निर्माण करण्यात राष्ट्रवादीला अपयश आले असेच खेदाने म्हणावे लागणार आहे. याला विरूध्द बाजूने पाहिले असता एकनाथराव खडसे, हरीभाऊ जावळे या भाजपमधील नेत्यांसमोर काँग्रेसमधील उल्हास पाटील, शिरीष चौधरी आदी नेत्यांप्रमाणे राष्ट्रवादीतील एकही नाव समोर आले नाही. यामुळे लेवा पाटीदार समाजात भाजप व काँग्रेस नेते दिसत असले तरी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शोधावे लागतात ही बाब कटू सत्य आहे. येथेच राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पराभव झाला.
मजबूत नेत्यांचा अभाव
अलीकडच्या कालखंडात माजी आमदार अरूणदादा पाटील व त्यांचे समर्थक राष्ट्रवादीत आले. मात्र त्यांना यावल-रावेरात नव्हे तर मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत तिकिट देण्यात आले. मात्र ते तिसर्या क्रमांकावर राहिले. आज सातपुड्याला लागून असणार्या पट्टयात अरूणभाई गुजराथी व त्यांच्या समर्थकांसह यावलमधील प्रा. मुकेश येवले व त्यांचे सहकारी, सावद्यातील राजेश वानखेडे व त्यांचा ग्रुप तर रावेरातील अरूणदादा पाटील, सोपान पाटील व त्यांचे सहकारी हा अपवाद वगळता राष्ट्रवादीला मजबूत नेते मिळाले नाहीत.
दुटप्पीपणाचा फटका
राष्ट्रवादी काँग्रेसने तापी खोर्यात पाळेमुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यासाठी अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांना मोठे बळ देण्यात आले. मात्र त्यांच्यासमोर मुक्ताईनगरात नाथाभाऊंसारखा प्रबळ उमेदवार असल्यामुळे ते तेथेच अडकून पडले. खरं तर पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष, पणनचे संचालक आदी महत्वाची पदे दिली. मात्र त्यांना यासोबत वा याऐवजी विधानपरिषदेची संधी दिली असती तर त्यांचा आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणात वाढला असता. मात्र तसे झाले नाही. येथील विनोद तराळ यांना पक्षाने फारशी रसद पुरवली नसल्याची बाबदेखील या पक्षाच्या वाटचालीत अडसर बनली. यासोबत जामनेरसारख्या मतदारसंघात संजय गरूड यांच्या रूपाने काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे एक मातब्बर नेता आला. मात्र तेदेखील गिरीश महाजन यांच्यासारख्या हेवीवेट नेत्यासमोर टिकू शकले नाही. तर याच जामनेरमधील ईश्वरबाबू जैन यांना पक्षाने खासदारकी दिली. मात्र पक्ष वाढीसाठी याचा उपयोग झाला नाही. एकीकडे पक्षात मानाचे पद भूषवायचे तर दुसरीकडे जाहीरपणे ना. गिरीश महाजन हे आपले मानसपुत्र असल्याचे जाहीरपणे सांगण्याची दुटप्पी भूमिका बाबूजींनी घेतल्याचा सरळ फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे नाकारता येणार नाही.
सर्वसमावेशकतेचा अभाव
राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात संधी होती ती भुसावळातून ! येथून संतोष चौधरी व त्यांचे बंधू अनिल चौधरी यांचा राष्ट्रवादीच्याच माध्यमातून राजकीय क्षितीजावर झपाट्याने उदय झाला. मात्र पक्षाने त्यांना वेळीच बळ देण्यास टाळाटाळ केली. यामुळे चौधरी बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही बाजूंची हानी झाली. तर संजय सावकारे यांना राज्यमंत्रीपद देऊन पक्षाने तापी खोर्यात पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, तेच राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याने पक्षाला याचा लाभ झाला नाही. यातूनच नाराज झालेल्या संतोष चौधरी यांनी मध्यंतरी शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा राष्ट्रवादीचा रस्ता धरला. तर अनिल चौधरी हे भाजपमध्ये गेले. आज संतोष चौधरी हे राष्ट्रवादीत असले तरी विश्वासार्हतेच्या अभावी त्यांच्यावर पक्षाने लोकसभेचा डाव लावला नसल्याची बाब उघड आहे. संतोष चौधरी यांच्यासह भुसावळ तालुक्यात ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी उमेश नेमाडे, जि.प. गटनेते रवींद्र नाना पाटील, माजी जि.प. सदस्य राजेंद्र चौधरी आदींसारख्या नेत्यांची फळी आहे. तथापि, हा विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे यापैकी कुणी आगामी निवडणुकीत कितपत रस घेणार हे आजच सांगता येणार नाही. तर मलकापूर-नांदुरा भागातही राष्ट्रवादीला सर्वसमावेशक चेहरा गवसला नाही. याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून देण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
भाकरी फिरवणार का ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे धक्कातंत्र देण्यासाठी ओळखले जातात. रावेरच्या जागेवरील सोडलेला दावा हादेखील याच प्रकारातील निर्णय असल्याची बाब उघड आहे. अर्थात, तब्बल दोन दशकांपासून या लोकसभा आणि याच्या अंतर्गत येणार्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आलेल्या अपयशाची ही एक प्रकारची जाहीर कबुलीदेखील आहे. आता नव्याने या भागात राष्ट्रवादीला मजबूत करावयाचे झाल्यास पक्षाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. यातील सर्वात महत्वाचा मुद्दा हा लेवा पाटीदार समाजातील सर्वमान्य चेहर्याचा शोध घ्यावा लागेल. याच्या जोडीला संधीसाधूंपेक्षा समर्पित नेत्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि हो… शरद पवार साहेबांच्याच भाषेत सांगायचे तर भाकरी फिरवावी लागणार आहे. पण ही भाकरी फिरणार कधी ? हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे.
शेखर पाटील ( संपादक- https://livetrends.news )