गणेशोत्सव बंदीवासात कशासाठी ? : आशिष शेलार

मुंबई प्रतिनिधी । राज्यात पब, डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती निर्माण झाली असून सरकारने कुणालाही विश्‍वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.

आज राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. गणेशोत्सवावर याहीवर्षी ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करीत असताना सरकारने कोणालाही विश्‍वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली आज जाहीर केली. कारखान्यांमध्ये मुर्ती तयार करण्याचे काम चार महिने अगोदरच सुरु होते तेव्हा पासून मुर्तीकार संघटना सरकारला विचारणा करीत होते पण त्याकडे दुर्लक्ष केले, असं शेलार म्हणाले.

कुणाशीही चर्चा न करता सर्वसमावेशक भूमिका न घेता सरकारने आता नियमावली जाहीर केली आहे. घरगुती गणेशाची मुर्ती २ फुटाची असा निर्बंध का घालण्यात आला? मग कारखान्यात तयार झालेल्या मुर्तींचे आता काय करणार? या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का? गतवर्षी पासून हा उद्योग अडचणीत आहे. त्यांना मदत तर दिली नाहीच पण आता ऐनवेळेस निर्बंध घालून त्यांची कोंडी ठाकरे सरकारने केली आहे. असा एकतर्फी निर्णय लोकशाहीत मान्य नाही. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा. जर बंदने घालण्यात येणार असतील तर मुर्तीकरांना मदतीचे पँकेज जाहीर करावे तेही शासनाचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

 

Protected Content