जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ पोलीस चौकाजवळून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टरवर महसूल पथकाने कारवाई करत मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पकडले. चालकाने ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा न करता भरधाव वेगाने पळवून नेले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस चौकातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव महसुल पथकाला मिळाली. त्यानुसार महसूल पथकाने मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर त्याला ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले असता ट्रॅक्टर चालक नवनाथ रोहिदास बाविस्कर वय ३० रा. कोळंबा ता. चोपडा याने ट्रक भरधाव वेगाने घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी मंडळाधिकारी छाया कोळी यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालक रोहिदास बाविस्कर आणि मालक वैभव चौधरी रा. चौघुले प्लॉट, जळगाव याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ अमोल विसपूते हे करीत आहे.