जमीन ४ कोटींची नाही तर ४०० कोटींचा गैरव्यवहार कुठे झाला ? – आ. खडसेंचा सवाल

नागपूर-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रीय महामार्गाला जमीन देत असतांना कोणतीही रॉयल्टी लागत नाही. परंतू असे असतांना याप्रकरणात तब्बल २० हजार ब्रास रॉयल्टी नेल्याची माहिती शासकीय खनिकर्म विभागाने सांगितले आहे. यावर जमीन चार कोटींची नाही तर चारशे कोटींचा गैरव्यवहार कुठे झाला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे मुक्ताईनगर तालुक्यात असणाऱ्या ३३ हेक्टर ४१ आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा होत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केला आहे. दरम्यान, आ. पाटील यांनी खळबजनक आरोप केल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून करण्याचे आदेश दिले आहे.

यावरून आ. खडसे यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. परंतू यात कोणत्याही घोटाळा झालेला नाही हे उत्तर आहे. परंतु, अध्यक्षांनी यात गैरव्यवहार आहे. एसआयटी नेमून टाका, असा आदेश दिला. एसआयटी नेमल्याने काही फरक पडत नाही. जे काही आहे ते तत्थ्य समोर येईल. निव्वळ राजकीय उद्देशानं बदनामी करण्यासाठी सभागृहाचा वापर करणे योग्य नाही. सभागृहातील चर्चेची पातळी खाली चालली आहे. एकमेकांचं व्यक्तिगत उट्ट काढण्यासाठी सूडबुद्धीनं काही निर्णय व्हायला लागले आहेत. तू माझ्या चौकशीची मागणी केली. मी तुझ्या चौकशीची मागणी करतो. अशास्वरुपाचं राजकारण चाललंय. वस्तुस्थिती शोधली पाहिजे. पुरावे शोधले पाहिजे. विनापुराव्यानं कोणी आरोप-प्रत्यारोप केले तर त्याचं समर्थन मी करणार नाही, हे अतिशय दुःखदायक असल्याचंही त्यांनी सांगितलं. जे केलेलं नाही त्यात काय. एसआयटी नव्हे कुठल्याही यंत्रणेमार्फत चौकशी करा. जी वस्तुस्थिती आहे ती समोर आहे. एसआयटी नेमा नाहीतरी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमा. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर काय कारवाई करायची ते मी ठरवेन, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

Protected Content