कोरोनाची तिसरी लाट केव्हा ओसरणार ? : जाणून घ्या तज्ज्ञांचे उत्तर

मुंबई प्रतिनिधी | देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने तिसरी लाट सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही लाट शिखरावर केव्हा असेल आणि ती केव्हा संपेल याबाबतचे संशोधन करून आयआयटीच्या तज्ज्ञांनी उत्तर दिले आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आयआयटी मद्रासनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, कोरोनाची तिसरी लाट पुढील दोन आठवड्यांत टोक गाठेल. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा दर म्हणजेच आर व्हॅल्यू १४ ते २१ जानेवारीदरम्यान १.५७ होता. म्हणजेच दोन व्यक्तींच्या माध्यमातून तीन जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. हा दर येत्या काही दिवसांत आणखी खाली जाईल, असं या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किती जणांना कोरोना बाधित करू शकते, त्या दराला आर व्हॅल्यू म्हटलं जातं. हा दर १ च्या खाली गेल्यास महामारीची स्थिती संपल्याचं समजतात.

आयआयटी मद्रासच्या अहवालानुसार, १४ ते २१ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू १.५७ होती. ७ ते १३ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू २.२ आणि त्याआधी १ ते ६ जानेवारी दरम्यान २.९ होती. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांत कोरोना प्रादुर्भावाचा दर कमी होताना दिसत आहे. पुढील १४ दिवसांत तिसरी लाट ओसरेल असा अंदाज आयआयटी मद्रासकडून व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात, दोन आठवड्यांच्या नंतर रूग्णसंख्या झपाट्याने कमी होणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Protected Content