रवींद्रभैय्यांच्या दुर्दैवाचा फेरा संपणार तरी कधी ?

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह अ‍ॅनालिसीस | जिल्हा बँकेच्या निकालातून राष्ट्रवादीला हादरा बसला असतांनाच नाथाभाऊंसोबत रवींद्रभैय्या पाटील यांना देखील धक्का बसला आहे. यातून भैय्यांच्या दुर्दैवाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

सुस्वभाव, सालसपणा आणि सज्जनता हे गुण राजकारणात तसे कामाला येत नाहीत. किंबहुना राजकारणात यशस्वी होण्यासाठी ते अडसर मानले जातात. तथापि, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील हे याला अपवाद ठरले आहेत. आजवर कपटी राजकारण न करतांनाही ते एका मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याची बाब अतिशय महत्वाची आहे. मात्र याचसोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील परायजाच्या ग्रहणाच्या छायेतून ते अद्याप बाहेर पडू शकलेले नाहीत.

आपल्या राजकीय आणि सहकारातील कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात रवींद्रभैय्या यांना चांगले यश मिळाले. प्रल्हादभाऊ पाटील यांचा वारसा ते समर्थपणे पुढे नेणार असल्याचे यातून स्पष्ट झाले होते. यातच, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आदींमध्ये त्यांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्यांच्या समोर उज्वल राजकीय कारकिर्दीचे दरवाजे आपोआपच उघडले होते. जळगावात सुरेशदादा जैन यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना अपयश आले. यानंतर त्यांनी मुक्ताईनगरातून एकनाथराव खडसे यांना आव्हान देण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले.

राष्ट्रवादीने लोकसभेची संधी देऊन देखील यात त्यांना अपयश आले. २०१९ साली हाता-तोंडाशी आलेला घास निसटून तो चंद्रकांत पाटील यांना फलदायी ठरला तरी त्यांनी कुरकुर केली नाही. आणि, त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नाथाभाऊ हे राष्ट्रवादीत आले तरी खुल्या दिल्याने स्वागत करण्याचा दिलदारपणा त्यांनी दाखविला. मध्यंतरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्या पदरात काही तरी पडेल असे वाटत असतांनाच सत्तांतर झाल्याने ही संधी देखील गेली.

यानंतर, मध्यंतरी झालेल्या जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत देवकरांसारख्या राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी सहजपणे विजय संपादन केला असतांना भैय्यांना अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. तेव्हाच आम्ही लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून त्यांच्या दुर्दैवावर भाष्य केले होते. अतिशय खेदजनक बाब म्हणजे आता देखील जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असतांना देखील त्यांचा एक मताने पराभव झाला.

या पराभवाच्या मागे अनेक कारणे आहेत. मात्र काहीही असले तरी रवींद्रभैय्यांना पुन्हा एकदा यशाने हुलकावणी दिली हे नाकारता येणार नाही. त्यांच्या मागे सुरू असलेल्या अपयशाचा फेरा कायम असल्याचेही यातून दिसून आले आहे. आता त्यांचा हा पराजयाचा शाप नेमका केव्हा नष्ट होणार ? याचे उत्तर येणारा काळच ठरविणार आहे. तूर्तास रवींद्रभैय्यांसारख्या ज्येष्ठ आणि सर्वार्थाने योग्य असलेल्या उमेदवाराचा अगदी ठरवून झालेला गेम हा राजकीय जाणकारांना देखील अस्वस्थ करणारा ठरला आहे.

Protected Content