आता ए.टी.नाना काय करणार ?

जळगाव (प्रतिनिधी) सलग दोनवेळेस विजयी होत, मंत्रिपदाच्या उंबरठयावर असतांना भाजपचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. परंतु या अपमानानंतर आता ए.टी.नाना नेमके काय करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ए.टी.नाना शांत राहतील की, आपले उपद्रव मूल्य सिद्ध करतील?, आजच्या घडीला ए.टी.नानांकडे कोणते पर्याय शिल्लक आहेत? आणि ते या पर्यायांचा उपयोग करतील का? हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.

 

कथित फोटोंचे राजकारण करत भाजपातील अंतर्गत विरोधकांनी ए.टी.पाटील यांचा पद्धतशीरपणे राजकीय गेम केला. सलग दोनवेळेस विजय मिळवीत ए.टी.नाना यांनी जळगाव लोकसभा मतदार संघावर चांगली पकड निर्माण केली होती. अगदी ते अश्लील फोटो व्हायरल झाल्यानंतरही त्यांच्याबद्दल सहानभूती निर्माण झाली होती. परंतु अखेर शुक्रवारी रात्री ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले गेले. आता ए.टी.नाना यांच्यासमोर मोजके तीन पर्याय शिल्लक आहेत.

 

खासदार ए.टी.नाना यांच्याकडे पहिला पर्याय आहे की, आपले जुने राजकीय संबंध वापरून राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी हायलेव्हलची फिल्डिंग लावायची. परंतु सध्याची राजकीय स्थिती बघता त्यांचा हा पर्याय पाहिजे तसा उपयुक्त ठरणार नाही. दुसरा पर्याय आहे की, अपक्ष उभे राहून भाजपची मते खात आपले उपद्रव मूल्य सिद्ध करायचे. तिसरा आणि अंतिम पर्याय आहे की, पक्षात राहून अंतर्गत कुरघोडी करत आपल्या विरोधकांना अडचणीत आणायचे. यासाठी सर्वप्रथम ते पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडू शकतात. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता ए.टी.नाना यांच्याकडे फार जास्तीचे पर्याय शिल्लक नाहीय. परंतु ते घरी बसल्या भाजपच्या उमेदवारासमोर शेकडो अडचणी निर्माण करू शकतात,हे देखील तेवढेच खरे आहे. त्यामुळे ए.टी.नाना कोणता पर्याय वापरतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Add Comment

Protected Content