जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्व असणारे एकनाथराव खडसे यांच्या अस्वस्थतेबद्दल सुरू असणार्या चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत जोरदार चर्वण सुरू आहे. या अनुषंगाने खडसे यांची आजची अवस्था आणि त्यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता याबाबत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी केलेले हे भाष्य खास आपल्यासाठी सादर करत आहोत.
आपण परंपरागत आखून दिलेल्या मार्गाने जात, चाकोरीतील जीवन जगत असतो. परिणामी आपण कुरणात आणि शेतात चालून चालून पडलेल्या वाटा सारख्या ठाराविक विचारांच्या वाटांवर आणि शिकलेल्या अन् न शिकवलेल्या वहिवाटांवरही यंत्रवत चालत असतो. तसे चालणे सवयीचे होते, सोपे वाटते. दुसर्या कुठल्याही वाटेने जाणे जणू आवाक्याबाहेरचे आहे असे आपल्याला वाटायला लागते. आयुष्य घडत जाते. आणि आपणच आपल्या चाकोरीमय वाटेचे स्वतःशीही स्पष्टीकरण करू लागतो. तसे करताना आपण नकळत आपल्या मळलेल्या, रूळलेल्या विचारांचे, आपल्यातील मानवी संभाव्यतेला मर्यादा घालणार्या प्रभावांचे भक्ष्य होऊन बसतो. स्वतःबद्दल अगतिक आणि नैसर्गिक प्रेरणेने जगणारे अशी कल्पना केल्याने आपल्या भरारीची उंची कमी करायला आपणच कारणीभूत ठरतो. तसेच काहीशी अवस्था काही राजकारण्यांमध्ये अलीकडच्या काळात दिसून येत आहे.
व्यक्तिगत कतृर्र्त्वाची परिणामकारक उंची असूनही पक्षांतर्गत कोंडमारा होत असतांना देखील मार्ग बदलण्यासाठी काढायची प्रतीक्षा हे निरर्थक काळहरण नव्हे का ?
शक्यतांचा खेळ आता संपलेला
माजी मंत्री एकनाथराव खडसे उर्फ नाथाभाऊ हे एकेकाळी भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा होते. त्यांचा शब्द किंवा निर्णय पक्षश्रेष्ठी ही सहसा बदलत नव्हते. राज्यातील पक्षाचा प्रभावशाली बहुजन चेहरा अशी ओळख त्यांनी निर्माण केली. मात्र गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने त्यांना अलगद बाजूला करत, पक्षांतर्गत त्यांची उपयुक्तता संपुष्टात आणली आहे. थोडक्यात पक्षाला आता खडसेंची गरज राहिलेली नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा पक्षीय भूमिका याबाबत चर्चा होते तेव्हा ते आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते अशी भलावण केली जाते. तात्पर्य पक्षात असल्यामुळे औपचारिक राजकीय प्रोटोकॉल म्हणून पाळण्यात येत आहे.
ज्यांची उपयुक्तता नसते त्यांना कोणताही पक्ष काढत नाही की पक्ष सोडण्याचे सांगतही नाही. भाजपमध्ये आता नवीन फळी नेतृत्व करीत आहे. साहजिकच आता त्यांना एके काळी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी संघर्ष करणारे नको आहेत. कारण आता पक्ष बलशाली अवस्थेत आहे. त्यामुळे भाजप मध्ये नाथा भाऊंसाठी कोणतीही जागा नाही. थोडक्यात अच्छे दिनची शक्यता नाथाभाऊंच्या बाबतीत तरी मावळल्यात जमा आहे.
श्री खडसे यांनी राजकारण सक्रीय ठेवायचे असेल तर त्यांना भूमिका बदलणे हाच एक पर्याय आहे. त्यांनी कोणत्या पक्षात जावे हा पूर्णपणे त्यांचा विषय आहे. ते प्रचंड अनुभवी आणि राजकीय मुत्सद्दी आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्षात त्यांच्या विषयी चर्चा जोरात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ त्यांनी बांधले तर त्या दोघांचाही फायदा आहे. कारण जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा सध्यातरी प्रभाव नाही. असलास तर तो त्यांच्या गावा पुरता आणि तोही विशिष्ट घटका पुरता मर्यादित असेल. कारण या पक्षात कार्यकर्ते कमी आणि स्वयंघोषित नेत्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राजकीय कर्तृत्वाची स्पर्धा ही फारशी उरलेली नाही.
दुसरीकडे ज्या पक्ष्यासाठी चाळीस वर्षे खस्ता खाल्ल्या त्यांनीही स्वतःच्या उपयुक्ततेचे दर्शन घडवता येईल. अर्थात हा माझा सल्ला नाही तर एक पत्रकार म्हणून माझे निरिक्षण वजा मत व्यक्त केले आहे. खरं तर राजकारण हा बिन भरवशाचा खेळ बनलेला आहे. पण म्हणून खेळ कधी थांबला आहे का ? एका कसलेल्या कलाकाराने म्हटल्याप्रमाणे शो मस्ट गो ऑन !
सुरेश उज्जैनवाल
सल्लागार संपादक
लाईव्ह ट्रेंडस् न्युज