भाजपाची सत्ता बरखास्त करण्यासाठी खडसे समर्थकांनी घेतली आयुक्तांची भेट ! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरू असतानाच , सोमवारी खडसे समर्थक व भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन मनपातील भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

शहरात अराजकता माजली असून , नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने महापालिका बरखास्त करा, अशी मागणी करीत खंदे समर्थक माजी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपला घरचाच आहेर दिला आहे. माजी नगरसेवक रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी व सुनील माळी यांनी मनपात येऊन आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. आयुक्तांच्या दालनात तब्बल पाऊण तास चाललेल्या चर्चेमध्ये मनपात विविध बेकायदेशीर ठराव पारित केले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला. याप्रकरणी मनपा आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी केली, अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली असताना मात्र याबाबत त्यांना विचारले असता माझ्या प्रभागातील समस्या संदर्भांत आयुक्तांना भेटायला गेल्याचे सांगत याबद्दल जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

“मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आयुक्तांना भेटायला गेलो होतो. माझ्या परिसरात जेथे मी आधी नगरसेवक होतो त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत त्या संदर्भात मी भेटायला गेलो होतो. परंतु माध्यमांनी याचा वेगळा अर्थ घेतला. त्यांच्याच नगरसवेकांनी मागे ही मागणी केली होती. मनपा बरखास्त होण्याचा निर्णय आयुक्त घेतील”.
– अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक, मनपा, जळगाव

Protected Content