Home Cities भुसावळ विकसित भारताचा संकल्प घेऊन भाजपची भुसावळात भव्य मोटारसायकल रॅली

विकसित भारताचा संकल्प घेऊन भाजपची भुसावळात भव्य मोटारसायकल रॅली

0
12

वरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अधोरेखित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला भुसावळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मातृभूमी चौक येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ आणि ‘सेवा ज्योती यात्रा’चे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

‘विकसित भारत-२०४७’चा संकल्प जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत राष्ट्रसेवा, विकास आणि जनभागीदारीचा संदेश देण्यात आला. घोषणांनी दुमदुमलेल्या उत्साहपूर्ण वातावरणात रॅली मार्गस्थ झाली. या उपक्रमामुळे भुसावळ शहरातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले.

मातृभूमी चौक येथे ‘सेवा ज्योती’ प्रज्वलित करून सेवा ज्योती यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी विकसित भारताच्या निर्मितीत आपापल्या परीने योगदान देण्याचा सामूहिक संकल्प केला. सेवा, समर्पण, राष्ट्रनिर्माण आणि जनसहभाग या मूल्यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात नागरिकांची भूमिका अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘विकसित भारत-२०४७’च्या संकल्पपूर्तीसाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सेवा आणि विकासाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अमोल जावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound