औरंगाबाद प्रतिनिधी | भाजप नेते राज्य सरकार पाडण्याचे महूर्त देत असतांना माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी मात्र आपण प्रखर विरोधकाची भूमिका पार पाडणार असल्याचे येथे सांगितले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असे भाकित केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या पार्श्वभूमिवर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश महाजन यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत थोडा वेगळा सूर लावला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत, असे गिरीश महाजन यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. राज्य सरकार असंवेदनशील असल्याची टीका करत महाजन म्हणाले,की राज्यातील पाटबंधारे विभागांतर्गत एकही काम सुरू नाही. फडणवीस सरकारच्या काळात ९० टक्के कामे पूर्ण झाली होती. पण पाच टक्के काम पूर्ण होत नसल्याने शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचू शकलेले नाही. वीज वसुली जुलमीपद्धतीने सुरू आहे. सरकार नीट काम करत नाही. पण सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका नीटपणे बजावत आहोत. यामुळे राज्य सरकार पडो की, नको पडो, आम्ही काम करत राहणार असल्याचेही गिरीश महाजन याप्रसंगी म्हणाले.