ओमिक्रॉनला घाबरू नका, काळजी घ्या ! : आयसीएमआर

मुंबई | कोरोनाचा ओमीक्रॉन हा नवीन व्हेरियंट घातक असला तरी यामुळे घाबरून जाण्याची गरज नसून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय वैद्यकीय संशोधक संस्था म्हणजेच आयसीएमआरने केले आहे.

करोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉन या व्हेरियंटच्या स्वरूपात समोर आल्यामुळे सध्या संपूर्ण जगात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शनिवारी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले. याच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही नवीन नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान, हे सारे होत असतांना भारतीय वैद्यकीय संशोधक संस्था म्हणजेच आयसीएमआरने ओमीक्रॉनबाबत दिलासा देणारी माहिती दिली आहे.

या संदर्भात आयसीएमआरने सध्या घाबरण्याची कोणतीही गरज नसून काळजी घेण्यासोबतच लवकरात लवकर करोनाचा दुसरा डोस घ्यावा असं आवाहन केलं आहे. ओमिक्रॉन मध्ये होत असलेले रचनात्मक बदल काळजी वाढवण्याची शक्यता कमी आहे. हा नवा विषाणू घातक किंवा अनेक आजार निर्माण करणारा ठरेल असं गरजेचं नाही. अशी कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नसून आपल्याला वाट पहावी लागेल, असं आयसीएमआरचे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितलं आहे.

तर दुसरीकडे, ओमिक्रॉन ज्या दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे तिथं गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. आफ्रिकन मेडिकल असोसिएशननं ओमिक्रॉन विषाणू त्यांच्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून असून त्यामध्ये ४५ वेळा बदल झाल्याचं सांगितलं आहे. ओमिक्रॉन विषाणू आढळला असला तरी तिथं मृत्यूची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. ओमिक्रॉननं संसर्गित होणार्‍या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत. त्यांची संसर्गाची लक्षण सौम्य असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी सांगितलंय. यामुळे ओमीक्रॉनच्या प्रतिकारासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Protected Content