मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक लढवावी. कारण, मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही. जरांगेंनी लोकसभा लढवली तर त्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येतील, असे ते म्हणालेत.
प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आवाहन केले. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे. त्यांनी आपला लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही. आमरण उपोषणातून जी जनजागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षणासाठी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगेंनी कोणत्याही पक्षाच्या आधाराने निवडणूक का लढवू नये? याचे उत्तरही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिले. व्यक्तीने एखाद्या पक्षाच्या आधाराने निवडणूक लढवली, तर त्या व्यक्तीवर त्या पक्षाची बंधने येतात. या बंधनांमुळे गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी जरांगे लोकसभेच्या निवडणुकीत बिनधोकपणे निवडून येतील असा दावाही केला. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. आमची भूमिका ते मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.
गरीब मराठ्यांचे व ओबीसींचे ताट वेगळे हवे अशी भूमिका आम्ही यापूर्वीच स्पष्ट केली आहे. ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. असे झाले तर हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळे असावे, अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ओबीसी समुदायात राजकीय जागृती झाली याचा मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली आहे. आता ते स्वतःच्या अधिकारांसाठी संघर्ष करत आहेत. यामुळे भाजपची धार्मिक विचारधारा कळून पडत आहे असे मला वाटते, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांना अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराविषयी प्रश्न केला असता त्यांनी बोलणे टाळले. अशोक चव्हाण भाजपमध्ये का गेले? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेतेच देऊ शकतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.