कासोद्याची पेयजल पुरवठा योजना ठप्प; अधिकारी व ठेकेदाराचे दुर्लक्ष

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । येथील नागरिकांसाठी तब्बल ११ कोटी रूपयांची मंजूर झालेली पेयजल पुरवठा योजना ठप्प झाली असून यात अधिकारी व ठेकेदाराची मिलीभगत असून ते याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, कासोदा हे एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून गेल्या अनेक दिवसापासून या गावाला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या गावाला वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुमारे १४ कि.मी लांब गिरणा नदीवरून पाणी आणणे जिकिरीचे झाले आहे. गावाच्या पाण्याची समस्या पाहता शासनाकडून सुमारे ११ कोटी रु. ची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना मंजूर झालेली आहे. या योजनेचा कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदारांना ११ एप्रिल२०१८ पासून दिला आहे. संबंधीत काम हे २१महिन्यात पूर्ण करून तीन महिन्यांची चाचणी घेऊन २४ महिन्यांत पूर्ण करून देण्यात यावे असे कार्यारंभ आदेशात म्हटले आहे. मात्र सध्याचा कामाचा वेग पाहता ही बाब अशक्यप्राय वाटत आहे. या योजनेतील पाण्याच्या टाक्या एक फिल्टर प्लांट धरणा पासुन ते गावापर्यंत दहा कि.मी.पर्यंत पाईप लाईन वर गावांतर्गत १५ किमी पाईप लाईन एवढे काम असून या कार्यारंभ आदेशाला तेरा महिने होऊनही या योजनेचे २५% कामही पूर्ण झाले नाही. या योजनेतील पाण्याची टाकी, फिल्टर प्लांट अद्याप तयार नाही. तसेच धरणापासून ते गावापर्यंत पाईपलाईन ही अर्धवट टाकलेली आहे. यामुळे योजनेचे काम बंद झाल्या सारखे दिसून येत आहे.

याबद्दल कासोदा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी शासकीय पाणीपुरवठा अधिकारी अभियंता निकम, शाखा अभियंता टी व्ही मनोरे, उपअभियंता एस.टी. नेमाडे यांच्याकडे कामाची विचारणा केली असता वरील अधिकारी म्हणतात की ठेकेदार ऐकत नाही. अर्थात, अधिकारीवर्गाची व ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे ११ कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे काम ठप्प झाले आहे. यात कोणाकडे दाद मागावी ? असा प्रश्‍न कासोदेकरांना पडला आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन कासोदा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Add Comment

Protected Content