राज्यात पाणीटंचाईचे संकट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दरवेळी होळीनंतर तापमानात वाढ होते. मात्र, यंदा होळीच्या अगोदरच तापमानात मोठी वाढ बघायला मिळाली. आता तर सातत्याने पारा वाढत आहे. मार्च महिन्यातच हवामान खात्याकडून तीनवेळा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि पुण्यात नागरिकांना उष्णतेने नको नको करून सोडले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वरच जाताना पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सूर्याने आग ओकली असल्याचे दिसून येत आहे. अशातच, आता राज्यातल्या सुमारे तीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा ५२ टक्क्यांवर आला असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याची मागणी वाढली असून धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. पावसाळ्यास अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर नागरिकांना राहावे लागणार आहे. धरणातील पाणीसाठा खूप कमी झाल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांत एकूण ४२ टक्के म्हणजेच ६ लाख १६ हजार ५५४ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

Protected Content