पाणीटंचाईमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर: शेतकऱ्यांचे जलशक्ती मंत्र्यांना निवेदन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील चोरवड, भोंडण आणि टिटवी आणि भडगाव तालुक्यातील पडासखेडा व महिंदडे या गावांमध्ये भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा तीव्र तुटवडा जाणवत असून, रब्बी पिके पाण्याअभावी करपत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना निवेदन देऊन गिरणा कॅनलद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

या गावांमध्ये मक्का, गहू, ज्वारी, बाजरी आणि हरभरा यांसारखी रब्बी पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेती करणे अशक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या या गावांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गिरणा कॅनल गावाजवळून असूनही या गावांना त्याचा लाभ मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. गिरणा कॅनल चोरवड गावापासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे. या कॅनलद्वारे या गावांना पाणीपुरवठा केल्यास शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी गिरणा कॅनलमधून सबकॅनल तयार करून या गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महिंदळे गावाजवळील 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाट कॅनलद्वारे पाच पांडव अंजनी नदीच्या खोऱ्यात पाणी सोडल्यास या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल. या संदर्भात तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पाणीटंचाईमुळे या भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.