जळगाव प्रतिनिधी | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. या सर्व गावांमध्ये ‘जलजीवन योजने’च्या अंतर्गत पाणी पुरवठा योजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून यासाठी तब्बल ११२ कोटी ५७ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. या सर्व गावांमध्ये जलजीवन योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून यासाठी तब्बल ११२ कोटी ५७ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातील ९० गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसह निविदा निघाल्या असून उर्वरित गावांच्या निविदा आठ ते दहा दिवसांमध्ये निघणार आहेत. या माध्यमातून या सर्व गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. तर जिल्ह्यातील उर्वरित गावांच्या योजनांच्या मंजुरीसाठी गती देण्याचे निर्देश देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकार्यांना दिले आहेत. तसेच जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातील सरपंचांनी पाणी पुरवठा योजनांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आधीच्या पाणी पुरवठा योजनांमधील सर्व त्रुटी दूर करून शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याच्या अंतर्गत सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजनेत जिल्ह्यातील ७३१ गावांसाठी तब्बल ९४७ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आधीच्या योजना या दरडोई ४० लीटर पाण्याच्या निकषावर आखण्यात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन ही ५५ लीटर दरडोई या निकषावर अंमलात आली आहे. आधी गुरांना लागणार्या पाण्याचा यात विचार करण्यात आला नव्हता. तर जल जीवन मिशनमध्ये याचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. आधीची योजना ही पाणी टाकीपर्यंत पोहचवण्यासाठी अंमलात आल्या होत्या. तर ‘जलजीवन मिशन’मध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे मिशन आखण्यात आले आहे. आधीच्या योजना जलसाठा करणाऱ्या टाकीपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी होत्या. आता जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक घराला नळजोडणी मिळणार आहे.
जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत १७५ गावांच्या योजनांना तांत्रीक मान्यतेसह मंजुरीचे आदेश मिळाले आहेत. यामध्ये ८५ गावांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्या निविदा प्रक्रियेत आहेत. तर उर्वरित ९० गावांच्या योजनांची निविदा प्रक्रिया येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण होणार आहे. या सर्व पाणी पुरवठा योजनांसाठी ११२ कोटी ५७ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या तालुक्यातील १७५ गावांच्या योजनांना मंजुरी !
जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत अमळनेर-२८; भडगाव-४; भुसावळ-५; चाळीसगाव-२०; बोदवड-१; धरणगाव-१०; एरंडोल-९; जळगाव-२०; जामनेर-१०; मुक्ताईनगर-८; रावेर-६; पारोळा-१८; पाचोरा-८; यावल-९ याप्रकारे एकूण १७५ गावांच्या योजनांना मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे.
दरम्यान, या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविडच्या आपत्तीतही कुणीही तहानलेला राहू नये असे आमच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचे कायम प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आगामी वर्षांमधील लोकसंख्यावाढ गृहीत धरून जलजीवन मिशनच्या अंतर्गत योजनांचे यशस्वी कार्यान्वय सुरू झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जलजीवन मिशन राबविण्यात येणार असून यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. यासोबत पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा स्त्रोत हा सर्वात महत्वाचा घटक असून तो तपासून घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून लोकवर्गणी जमा करणे देखील आवश्यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर योजनेचा प्रस्ताव हा अधिकार्यांकडे सादर करावा.
जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकजकुमार आशिया, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता जी. एस. भोगवाडे , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.सी. निकम आणि ए. बी. किरंगे यांच्याकडे पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. आपण कोरोनामुळे होम क्वॉरंटाईन असलो तरी योजनांच्या मंजुरीचे काम थांबणार नसल्याची ग्वाही ना.गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.