जळगाव प्रतिनिधी । सध्या उन्हामुळे जीवाची लाही लाही होत असून तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले आहे. अन्न पाण्यावाचून अनेक पक्षी तडफडताना दिसत आहे. खान्देश कन्या महिला मंडळातर्फे रायसोनी नगर परिसरात पक्षांसाठी मातीच्या भांड्यात पाणी व अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पक्षांच्या दानापाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सुजाण नागरिक पुढे सरसावले आहेत. लांडोर खोरी उद्यान जवळील रायसोनीनगर परिसरातील रहिवासी तसेच खान्देशकन्या महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी यांनी पुढाकार घेऊन कॉलनी परिसरात अनेक महिलांना सोबत घेऊन पक्षांना गार पाणी मिळावे म्हणून मातीच्या ( बडगी ) भांड्यात पाणी आणि धान्याची व्यवस्था करीत आहेत. या स्पृहणीय कार्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे. त्यांनी पाण्यासाठी व अन्नासाठी भांडी घेऊन जबाबदारीने ते कार्य करीत आहेत. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी थंड राहते . पर्यावरण जागृती , पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि जंगलातील जीवजंतूंना आधार मिळावा म्हणून हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मंगलाबाई बारी व पर्यावरण आणि जलमित्र तुषार वाघुळदे यांनी सांगितले.
नागरिकांनी, पर्यावरण प्रेमींनी रखरखते ऊन लक्षात घेता पक्षी वाचवा असे अभियान स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन राबवावे आणि त्यांचा जीव वाचवावा तसेच तहानलेल्या पक्षांची तृष्णा भागवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या महत्वपूर्ण अभियानात सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी, पर्यावरण प्रेमी तुषार वाघुळदे, सोनाली चौधरी, सुषमा भावसार, वंदना पाटील, वंदना बारी, सोनल कपोते, पूनम बारी, टीना बारी आदींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला .