थकीत पगार न मिळाल्यास वॉटर ग्रेसच्या कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 05 at 6.50.48 PM

जळगाव, प्रतिनिधी | गेल्या अडीच महिन्यापासून वाटर ग्रेसच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने आज त्यांनी महापालिकेत दुपारी २ वाजेपासून महापालिका आवारात आंदोलन छेडले होते. संध्याकाळी अखिल भारतीय मजदूर संघाचे ईश्वर घेंगट यांच्यासह ठेकेदाराचे प्रतिनिधी व उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत जो पर्यत थकीत वेतन मिळणार नाही तोपर्यंत काम बंद चा इशारा घेंगट यांनी दिला.

या बैठकीत वॉटर ग्रेसच्या प्रतिनिधींनी त्यांचे मनपाकडे बील थकीत असल्याने कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नसल्याचे मत मांडले. यावर उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी आक्षेप घेत ठेकेदाराने त्रुटी असलेले बिल सादर केल्याने ते पास होऊ शकले नसल्याचे ठेकेदाराच्या प्रतिनिधीस सांगितले. ठेकेदाराने त्यातील काही त्रुटीची पूर्तता काल ४ डिसेंबर रोजी केली असून दोन त्रुटीची पूर्तता अद्यापही केली नसल्याचे दंडवते यांनी स्पष्ट केले. उपायुक्त दंडवते यांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्याची जबाबदारी ही पूर्णपणे ठेकेदाराची आहे. ठेकेदाराला बिल वेळेत अपेक्षित असेल तर त्यांनी परिपूर्ण बिल वेळोवेळी मनपाकडे सादर करावे असे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले. ठेकेदाराला अचानक काम बंद करता येणार नाही जर त्याला कामबंद ठेवायचे असेल तर पूर्व सूचना देणे आवश्यक असून जर अचानक काम बंद केले तर ते कारवाईस पात्र असतील अशी माहिती उपायुक्त दंडवते यांनी दिली. वॉटर ग्रेस कंपनीने मनपाच्या १९ अटी शार्तीपैकी एकही अटी शर्त पूर्ण केली नसल्याचा आरोप अखिल भारतीय मजदूर संघाचे ईश्वर घेंगट यांनी केला. जोपर्यंत मोबदला मिळणार नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी कामावर जाणार नसल्याचा पवित्रा घेंगट यांनी घेतला. उद्यापासून दोन दिवस कामबंद आंदोलन करण्यात येईल व तिसऱ्या दिवशी वॉटर ग्रेसच्या जाकीटांची होळी करण्याचा इशारा घेंगट यांनी दिला.

Protected Content