एटीएम आणि बँक व्यवहारांच्या समस्यांवरून पाचोऱ्यात जनआंदोलनाचा इशारा; पत्रकारांचा पुढाकार


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहर आणि तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांशी निगडित असलेल्या एटीएम सेवा आणि बँक व्यवहारांतील सततच्या अडचणींवरून जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा शहरातील पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. २९ मे रोजी पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्यासह स्थानिक आमदार किशोर पाटील यांचे प्रतिनिधी व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांना सविस्तर निवेदन दिले.

निवेदनाची दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ कृती करत, आज ३० मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाचोरा शहरातील सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत बँक व्यवस्थापकांशी थेट संवाद साधून समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी:
सध्या पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना एटीएम केंद्रे वारंवार बंद असल्याने रोख रक्कम मिळण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. ‘नेटवर्क समस्या’, ‘कॅश उपलब्ध नाही’, ‘देखभाल सुरू आहे’ अशा सूचना लावून अनेक एटीएम बंद ठेवले जातात. याचा सर्वाधिक फटका खरीप हंगामाच्या तोंडावर असलेल्या शेतकरी वर्गाला बसत आहे. पीक कर्जाची रक्कम खात्यात जमा होऊनही एटीएम बंद असल्यामुळे किंवा बँकांमध्ये होणारी गर्दी व तांत्रिक अडचणींमुळे त्यांना वेळेवर रक्कम मिळत नाही. यामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होत असून, त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण वाढत आहे.

पत्रकारांच्या प्रमुख मागण्या:
पाचोरा शहर व तालुक्यातील सर्व एटीएम केंद्रांची तातडीने तपासणी करून कार्यरत व बंद एटीएमचा डेटा संकलित करावा. वारंवार बंद राहणारे एटीएम कार्यान्वित करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी. प्रत्येक बँकेने किमान एक एटीएम केंद्र २४ तास कार्यरत ठेवावे, विशेषतः शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अत्यावश्यक आहे. प्रत्येक एटीएम कॅबिनमध्ये मशीन बंद असल्यास त्वरित संपर्क साधता यावा यासाठी संबंधित बँकेच्या किमान चार अधिकाऱ्यांची नावे व कार्यरत मोबाईल क्रमांक नमूद असलेले सूचना फलक लावावेत. बँकेच्या सेवा संदर्भात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी नागरिकांकडून लेखी स्वरूपात संकलित करून त्यावर संयुक्त बैठक घ्यावी. बँक व्यवहारांसाठी हिंदी व मराठीत मितभाषी अधिकारी/कर्मचारी नियुक्त करावेत.

आंदोलनाचा इशारा:
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वरील सर्व मागण्या ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात. अन्यथा, जनहितार्थ सामाजिक बांधिलकीतून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. यामध्ये सतत बंद राहणाऱ्या एटीएम केंद्रांना ढोल-ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून लोकशाही पद्धतीने ‘अंत्यसंस्कार’ करण्यात येतील, ज्यात रेल्वे स्टेशनबाहेरचे सतत बंद राहणारे एटीएम प्रमुख केंद्र असेल. यानंतर संबंधित बँक व्यवस्थापकांना गुलाबपुष्प व पेन अर्पण करून ‘नम्रतेने जागृती’ करण्यात येईल. जर बँक व्यवस्थापनाने सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता बँकेसमोर ‘ढोल बजाओ आंदोलन’ राबवण्यात येईल.

राजकीय संबंधाचा इन्कार:
या संपूर्ण चळवळीचा मूळ हेतू जनतेच्या मुलभूत गरजांकडे लक्ष वेधून त्या सोडविणे हा असून, याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी वा प्रवृत्तीसोबत संबंध नसल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले आहे.

आमदार किशोर पाटील यांची तात्काळ दखल:
या संपूर्ण घडामोडीत आमदार किशोर पाटील यांची तात्काळ प्रतिक्रिया आणि कार्यवाही उल्लेखनीय ठरली आहे. निवेदन प्राप्त होताच त्यांनी काही सेकंदात याची गंभीर दखल घेत, लगेचच आज ३० मे रोजी सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व अडचणींचा सखोल आढावा घेऊन, नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पत्रकारांनी केलेल्या संयमी व लोकशाही माध्यमातून सुरू झालेल्या चळवळीला प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मिळालेला हा प्रतिसाद निश्चितच आदर्शवत आहे. ही बैठक व त्यानंतर होणारी कार्यवाही पाचोरा शहर व तालुक्याच्या बँकिंग प्रणालीत सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी सर्वसामान्यांची आशा आहे.