यावल ( प्रतिनीधी) तालुक्यातील आदीवासी क्षेत्र जामुनझीरा येथे राहात असलेल्या आदीवासी बांधवांना आठ वर्षापुर्वी जिल्हास्तरीय वनहक्क समितीव्दारे मंजुर केलेल्या वनहक्क दाव्यांप्रमाणे वहीवाट करून मिळत नसल्याने तात्काळ निर्णय न घेतल्यास ८ एप्रिल रोजी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात जामुनझीरा येथील रहिवासी सावजा गल्या बारेला, रेजला पीदा बारेला, गेमला झझाल बारेला यांनी फैजपूर विभागाचे प्रांत आधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामुनझीरा या आदीवासी गावात आम्ही राहात असुन दिनांक ३० जुन २०१० रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीने आमचे वनहक्क दावे मंजुर करून आम्हास कायदेशीररित्या वनहक्काचे पत्र दिले आहे, असे असतांना देखील मागील २ ते ३ वर्षांपासुन यावल विभागाचे वनधिकारी हे आमची वनजमीनीवर वहीवाट करून देत नसून दिनांक १५/९/२०१८ रोजी आपल्या कार्यालयात यासंदर्भात अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाची दखल घेवुन आपणाकडुन वन विभाग व भुमी अभीलेख या कार्यालयास पत्र देवुन दोन महिन्याच्या आत जमिनीची मोजमाप करून वनजमीन आदीवासी बांधवांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश पत्र असतांनाही अद्याप या संदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली दिसुन येत नाही.
त्यामुळे आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील आम्ही लेखी निवेदनाव्दारे केली असुनही अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तरी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातुन दिनांक १/११/२०१८ रोजी दिलेल्या आदेशाद्वारे अंमलबजावणी करून संबधीत अधिकारी यांच्याकडुन वन जमिनीची वहीवाट मोजमाप करून द्यावी व आदिवासींवर झालेला अन्याय आठ दिवसांच्या आत दूर करावा. तसे न झाल्यास दिनांक ८/०४/१९ पासुन प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा या निवेदनाव्दारे त्यांनी दिला आहे.