जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | के.सी.ई.सोसायटीचे शालेय समन्वयक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक चंद्रकांत भंडारी हे विद्यार्थी दिंडीबरोबर वारीत विठ्ठल नामाच्या जयघोषासह चालत आहेत. आज या प्रवासाला ४० वर्षापेक्षा अधिक वर्ष झाली आहेत.
शाळा बदलल्या, गावं बदलली, पद बदलली पण ३ ते १८ वयोगटातील शालेय लेकरांबरोबर आषाढी दिंडी काही थांबली नाही ! आणि टाळं मृदूंगांच्या गजरात विठ्ठलमय होणं काही थांबलं नाही ! ही अनोखी कहाणी आहे जळगावच्या के.सी.ई.सोसायटीचे शालेय समन्वयक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक चंद्रकांत भंडारी यांची.
गेल्या ४० वर्षापासून दरवर्षी अगदी कोरोना काळातही भंडारी विद्यार्थी दिंडीबरोबर वारीत विठ्ठल नामाच्या जयघोषासह चालत “विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा” या निरंतर प्रवाहात असतात. पु.ल.देशपांडे, कवी केशव मेश्राम, कामगार कवी नारायण सुर्वे, डॉ. राम जोशी, प्राचार्य राम शेवाळकर, गीतकार तथा कवयित्री शांता शेळके यासारख्या दिग्गज साहित्य सारस्वतांबरोबर ‘वारी‘त फिरण्याचं सद्भाग्यही त्यांन लाभलयं. ज्ञानरचनावादाचे वारकरी चंद्रकांत भंडारी मुलांसोबत लहान होऊन रमतात. आजही आषाढी एकादशीच्या अनुषंगानं ते चिमुकल्यांच्या दिंडीत सहभागी झाले. चिमुकल्यांनीही दिंडीची अनुभूती घेतली.