मुंबई प्रतिनिधी । शहरातील वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल सध्या निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालयाची जवळपास 230 कोटी रुपयांचे अनुदान थकित आहे, ज्यामुळे वाडिया रुग्णालयाचा कारभार चालणे आता अवघड होऊन बसला आहे. लालबावटा, जनरल कामगार युनियन तर्फे वाडिया रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी उद्यापासून निदर्शने निदर्शने करणार आहे.
वाडियाची दोन रुग्णालये, वाडिया मेटरनिटी आणि वाडिया चिल्ड्रेन, या दोन्ही रुग्णालयांमध्ये एकूण 250 पेक्षा अधिक डॉक्टरांची टीम काम करत आहे. तर 1500 पेक्षा अधिक कर्मचारी येथे कार्यरत आहेत. वाडिया रुग्णालय हे ट्रस्ट मार्फत संचालित केले जाते. त्यात ट्रस्ट, मनपा आणि राज्य सरकार या तिघांच्या निधीतून रुग्णालयाचा कार्यभार चालतो. पण गेल्या काही वर्षांपासून मनपा आणि राज्य सरकारकडून रुग्णालयाला मिळणारा निधी थकित असल्यामुळे तब्बल 230 कोटी रुपयांच्या निधी अडकला आहे. म्हणून रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. मनपा आणि राज्य सरकार रुग्णालय प्रशासन थकित निधी कधी देणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.