मतदार जनजागृती एक्सप्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत

Railways station janjagruti

जळगाव प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृतीसाठी रेल्वेचे सहकार्य घेण्यात आले असून मतदार जागृतीचा संदेश देणाऱ्या हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसचे जळगाव रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वागत केले.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हानिवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार वैशाली हिंगे, तहसीलदार (कुळकायदा) शरद मंडलीक, तहसीलदार (संजय गांधी) दळवी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा, डी. एम. तोमर, स्टेशन मास्तर अरुण कुमार पाण्डेय, मुख्य तिकिट तपासणीस डी. आर. पाटील, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, शिक्षणाधिकारी देविदास महाजन, निवडणूक नायब तहसीलदार श्री. अनंत कळसकर यांचेसह निवडणूक शाखेचे व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील विविध शाळांचे विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज सकाळी 10.35 वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद रेल्वेचे आगमन झाले. यावेळी मतदान करण्याबाबत आवाहन करणारे फलक प्रदर्शित करण्यात आले होते. प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन विविध घोषवाक्यांद्वारे करण्यात आले. मतदानाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीचे घोषवाक्य म्हटले. रेल्वेतल्या प्रवाशांनी उत्साहाने या उपक्रमाला प्रतिसाद दिला. दारात उभ्या असलेल्या काही प्रवाशांनी आपण मतदान करणार असल्याचे सांगितले. फलाटावर उतरलेल्या प्रवाशांनादेखील मतदानाचे आवाहन करण्यात आले. रेल्वेच्या माध्यमातून मतदार जागृतीचा संदेश दूरवर जाईल, असा विश्वास यावेळी डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला. त्यानंतर डॉ. ढाकणे, श्री. गाडीलकर व श्री. पाण्डेय यांनी रेल्वेच्या पुढच्या प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखविली.

 

देशभरात लांब पल्ल्याच्या 4 रेल्वेगाड्यांद्वारे मतदार जागृतीचा संदेश देण्यात येत आहे. रेल्वे गाड्यांवर मतदार हेल्पलाईन क्रमांक, मतदानाचे आवाहन, मतदार पोर्टल आदींबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. सहा राज्यातून धावणारी हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस दररोज 2087 किलोमीटरचा प्रवास करते. या रेल्वेच्या माध्यमातून 60 पेक्षा अधिक रेल्वेस्थानकावर संदेश देण्यात येत आहे. ही एक्सप्रेस गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, ओडिसा, प. बंगाल या पाच राज्यातून जात आहे.

Add Comment

Protected Content