नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. केंद्रशासीत चंदीगडसह आठ राज्यातल्या 57 जागांवर मतदान होत आहे. यात पंजाबमधील 13, हिमाचल प्रदेशातील 04, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगाल 09, बिहार 08, ओडिशा 06, आणि झारखंडच्या 03 लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या सर्व मतदार संघात एकूण 904 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अभिषेक बॅनर्जी, मीसा भारती, कंगना रनौत यांचा समावेश आहे. आता पर्यंत 486 जागांवर मतदान झाले आहे. लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा विधानसभेसाठीही मतदान झालेले आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज संध्याकाळी सहानंतर एग्झिट पोल दाखवता येणार आहेत.
उत्तर प्रदेशातील 13 जागांवर मतदान होत आहे. यात महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगांव , घोसी, सलेमपुर, बलिया, गाजीपुर, चंदौली, वाराणसी, मिर्जापूर आणि राबर्ट्सगंज या जागांचा समावेश आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसचा गड मानला जाणारा दक्षिण बंगालमध्येही आज मतदान सुरू आहे. डमडम, बारासात, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या जागांवर मतदान सुरू आहे. 2019 ला या सर्व जागांवर तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. हिमाचल प्रदेशातही मतदान होत असून इथे अभिनेत्री कंगना रणौत आणि हिमाचल प्रदेश चे मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्यात लढत होत आहे. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरही मैदानात आहेत. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्माही निवडणूक रिंगणात आहेत.