जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असतांना जळगावातील टॉवर चौकात मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील याच्या समर्थनार्थ शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानुसार जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील मराठा समाजाच्या वतीने टॉवर चौकात मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण संदर्भात जाहीर पाठिंबा देऊन शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश जारी केलेले असताना जमावाने जोरदार घोषणबाजी करत टॉवर चौकात येऊन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन केले. त्यानुसार दुपारी ४ वाजता पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंदोलनकर्ते विजय लक्ष्मण बांदल, मीराबाई लक्ष्मण बांदल, गणेश शंकर मोझर, लता गणेश मोझर, राजेंद्र बापूराव पोकळे यांच्यासह इतर दहा ते बारा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण ठाकूर हे करीत आहे.