Home Cities जळगाव विंटेज रोल्स रॉईसने वेधले जळगावकरांचे लक्ष 

विंटेज रोल्स रॉईसने वेधले जळगावकरांचे लक्ष 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात आज एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दाखल झालेल्या विंटेज रोल्स रॉईस कारने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शाही थाट आणि आकर्षक डिझाइनमुळे ही आलिशान गाडी पाहण्यासाठी रस्त्यावरच नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी गाडीसमोर थांबून सेल्फी घेतले, तर काहींनी या दुर्मिळ कारचे फोटो काढत तिच्या ऐतिहासिक आकर्षणाचा अनुभव घेतला.

ही विंटेज रोल्स रॉईस कार वधू-वरांसाठी खास मागविण्यात आली होती. शहरातील एका फुल विक्रेत्याकडे ही कार काही वेळ थांबली असता परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. गाडीचा क्लासिक लुक, आकर्षक रंगसंगती आणि देखणा थाट यामुळे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. अनेक नागरिकांनी प्रथमच इतक्या जवळून रोल्स रॉईस पाहिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

या गाडीचे मालक दीपक तांबे यांनी सांगितले की, त्यांच्या संग्रही अशा प्रकारच्या चार विंटेज कार आहेत. ते छत्रपती संभाजीनगर येथून ही कार खास ऑर्डरसाठी जळगावात घेऊन आले होते. लग्न समारंभ, विशेष कार्यक्रम किंवा मान्यवरांच्या स्वागतासाठी या गाड्यांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाड्याबाबत माहिती देताना दीपक तांबे म्हणाले की, जळगाव, धुळे आणि भुसावळ येथे ही कार आणण्यासाठी ५१ हजार रुपये भाडे आकारले जाते, तर छत्रपती संभाजीनगर शहरात २१ हजार रुपये भाडे घेतले जाते. शाही आणि विंटेज लूकमुळे अनेक जण आपल्या खास क्षणांना संस्मरणीय बनवण्यासाठी अशा कारची निवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound