Home Cities जळगाव मोहाडी येथे भव्य हिंदू मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मोहाडी येथे भव्य हिंदू मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
113

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘जाती-पातींच्या भिंती तोडून हिंदू समाजाने संघटित व्हावे’ या उदात्त हेतूने जळगाव शहरातील मोहाडी येथील मारुती मंदिर परिसरात ‘भव्य हिंदू मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी, २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता मोहाडी गावातून काढण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने झाली. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या उपस्थितीत निघालेल्या या दिंडीने संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुख्य मेळाव्याला सुरुवात झाली.

या सोहळ्याला आदिकवी महर्षी वाल्मिकी गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. योगीराज महाराज कानडदेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजाला आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच, विश्व हिंदू परिषदेचे प्रखर वक्ते देवेंद्र भावसार यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हिंदू समाजाने विखुरलेले न राहता संघटित शक्ती म्हणून कसे उभे राहावे, यावर प्रकाश टाकला.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या मेळाव्याचा मुख्य उद्देश हिंदूंमधील अंतर्गत भेद मिटवून त्यांना एका सूत्रात गुंफणे हा होता. मारुती मंदिर परिसरात झालेल्या या मेळाव्यामुळे मोहाडी आणि परिसरातील हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहाडी येथील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound